Sunday 9 June 2024

 'धनु' ....... अशी हाक मारल्यावर 'हो सर ' अशी साद आता ऐकायला मिळणार नाही.    धनश्री म्हणजे धनु शाळा सोडून गेली. शाळा सुरू झाल्यावर ती वर्गात  नसेल ही भावनाच फार वेदना देणारी आहे. पालकांचे कामासाठी होणारे स्थलांतर आणि त्यामुळे अनेक दिवसांपासून घडवलेली मुले शाळा सोडून जाणे  ही समस्या माझ्यासारख्या शिक्षकांना फार अवघड स्थितीत टाकते.  धनु अनेक चांगल्या गुणांनी समृद्ध असलेली मुलगी. हुशार,चाणाक्ष, प्रेमळ , काहीतरी मोठे करण्याची आकांक्षा अशा कितीतरी गुणांनी ती परिपूर्ण आहे. आम्ही कितीतरी गोष्टी हसत-खेळत शिकलो. 

शिक्षक शाळेत अनेक विद्यार्थी घडवत असतो पण काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना बघून शिक्षक स्वतः घडत असतो. धनश्री त्यापैकीच एक. अभ्यासात ,उपक्रमांत ,स्पर्धांत अनेक वेळी तीने शाळेचे नाव केले आहे. मी एखाद्या चुकीवर तिला रागावलो  तरी क्षणात जवळ येणारी धनु आता माझ्या  जवळ नाही.

तिच्यामुळे अनेकदा मी ,शाळेने अभिमानस्पद क्षण अनुभवले. विज्ञान प्रदर्शनात अगदी  वेळेवर तिने दिलेले भाषण असो की बालेवाडी येथील राष्ट्रीय विज्ञान परिषदेत तिने तेथील Science Talk येथे विचारलेला प्रश्न आणि त्यासाठी तिला आणि शाळेला मिळालेली दाद मी कधीच विसरू शकणार नाही.  

आमच्या शाळेत सुरु असलेल्या 'माझा गाव माझी बातमी' या channel ची ती प्रमुख घटक . आता ती नाही तर यावर्षी शून्यातून सर्व सुरु करावे लागेल. तिच्यासाठी मी अनेक गोष्टी ठरवल्या होत्या , पण .... 

शाळेतील अशी एकही गोष्ट नाही ज्यात तिचा सहभाग नसेल. प्रत्येक कामात  ती पुढे होती. माझ्याही पुढे. ती होती तर मलाही चार हात असल्यासारखे वाटत होते. तिने माझी फार काळजी घेतली. 

ती शाळेत नसली तरी तिचा भास मला प्रत्येक ठिकाणी होईल. वर्गात शिकवतांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर कुणालाच आले नाही तेव्हा ती आठवेल.

आमच्या शाळेचा ती भक्कम पाया होती. आमच्या प्रयोगशाळेतील ती महत्वाचा भाग होती. ती माझा उजवा हात होती.  ती जावू नये असे मनापासून वाटत होते पण मी तिला थांबवू शकलो नाही. मी जितके तिला प्रेम दिले त्यापेक्षा कितीतरी पटीने तिने मला दिले.  निरोप देतांना माझ्या छातीशी कवटाळलेल्या धनुला सोडूच नये असे वाटत होते. पण ती गेली, अनेक  आठवणी ठेवून.

तु माझ्या मनाच्या सर्वात सुंदर कप्प्यात सदैव राहशील,धने.

 

खूप प्रेमNo comments:

Post a Comment