माझा गाव, माझी बातमी: एक शिक्षक म्हणून माझा अनुभव
माझ्या शाळेत ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण देताना नेहमी विचार येत असे की, या विद्यार्थ्यांचे जग एका मर्यादेत का अडकले आहे? त्यांना शिक्षणाबरोबरच जीवनातील वेगवेगळ्या गोष्टींची ओळख कशी करून देता येईल? याच विचारातून "माझा गाव, माझी बातमी" या उपक्रमाची सुरुवात झाली.
उपक्रमाची कल्पना कशी सुचली?
ग्रामीण भागातील मुले त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल खूप चांगल्या निरीक्षणशक्तीने विचार करत असतात. मात्र, त्यांच्या कल्पना आणि विचार बाहेरच्या जगापर्यंत पोहोचत नाहीत. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना काहीतरी वेगळं शिकवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करण्याची कल्पना सुचली.
विद्यार्थ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव
या उपक्रमासाठी सुरुवातीला विद्यार्थ्यांना बातमी तयार करणे, कॅमेऱ्याचा वापर, व्हिडिओ एडिटिंग, आणि सोशल मीडियावर ते कसे अपलोड करायचे, याबद्दल शिकवले. मला आठवतं, पहिल्यांदा मुलांनी गावातील water system यावर बातमी तयार केली. त्यांच्या डोळ्यातली उत्सुकता आणि आत्मविश्वास बघून माझं मन भरून आलं.
प्रत्येक मुलाकडे एक अनोखी दृष्टीकोन आहे. त्यांच्या कल्पना मी कधीही अडवल्या नाहीत, उलट त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यामुळे त्यांचं काम अधिक सृजनशील आणि स्वाभाविक वाटतं.
या उपक्रमाचा परिणाम
या उपक्रमामुळे माझ्या विद्यार्थ्यांनी केवळ पत्रकारिता शिकली नाही, तर त्यांनी शाळेत उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. त्यांच्या बातम्यांमुळे गावातील अनेक समस्यांकडे लोकांचं लक्ष गेलं आहे.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे, या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि संवादकौशल्य वाढवले. आता ते आपले विचार निर्भयपणे मांडतात, जे मला एक शिक्षक म्हणून अत्यंत समाधानकारक वाटतं.
एक शिक्षक म्हणून समाधान
माझ्यासाठी "माझा गाव, माझी बातमी" केवळ एक उपक्रम नसून, विद्यार्थ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मला माझ्या विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकांपुरते शिकवण्यापेक्षा जास्त काहीतरी देण्याची संधी मिळाली.
पुढील स्वप्न
या उपक्रमाला पुढे नेऊन अधिक विद्यार्थ्यांना जोडण्याची आणि त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात यश मिळवून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन देण्याची माझी इच्छा आहे. "माझा गाव, माझी बातमी" हा उपक्रम केवळ शिक्षण नव्हे, तर सामाजिक बदल घडवण्याचे साधन बनले आहे.
No comments:
Post a Comment