Wednesday 5 July 2023


Dear girls, your health matters...

 
काही  दिवसांआधी वर्गात एक मुलगी रडायला लागली. अनेकदा विचारले  पण ती काही बोलत नव्ह्ती आणि मलाही तिच्या रडण्यामागचे कारण समजत नव्हते . खूप विचारल्यावर ती बोलली ,"सर ,तुम्हाला सांगू शकत नाही ."
मी समजून गेलो. मासिक पाळीच्या त्रासाने त्या मुलीच्या पोटात फार दुखायला सुरू झाले होते. मलाही काय बोलावे समजत नव्हते . शेजारच्या वर्गातून शाळेतील मॅडम ला निरोप धाडला आणि मग त्यांनी तो विषय हाताळला . 
पण , ""सर ,तुम्हाला सांगू शकत नाही ." त्या मुलीचे हे वाक्य मला दिवसभर टोचत राहिले. आपली प्रत्येक गोष्ट सांगणारे माझ्या वर्गातील विद्यार्थी आणि माझे नाते मित्रत्वाचे आहे. त्यामुळे ते अनेकदा मला त्यांच्या घरातील समस्याही सांगतात. शाळेमध्ये माझे आणि विद्यार्थ्यांचे मैत्रीपूर्ण कसे ठेवता येईल याकडे अधिक लक्ष देत असतो.  परंतू, मासिक पाळीच्या चुकीच्या समजुतीमुळे मुली आजही हा विषय बोलायला फार घाबरतात,किंवा लाजतात. 
मी तेव्हाच ठरवले , मुलींसोबत हा विषय बोलायचा. सुरुवातीला मलाही थोडे अवघड वाटले पण जसजसा हा विषय मी मुलींसोबत बोलत गेलो तसतसे वातावरण एकदम खेळते झाले. 

मासिक पाळीचे कारण , त्याचे फायदे , घ्यावयाची काळजी ,इत्यादी गोष्टी मी मुलींसोबत बोललो आणि मग त्याही बोलत्या झाल्या.  नंतर तर त्याच इतक्या बोलायला लागल्या कि हा विषय आपण विचार करतो तितका गंभीर नाही याची खात्री पटली  . 
 ग्रामीण भागातील शाळेत मुलींना  मासिक पाळी  आल्यावर  मुली घरी जातात परंतु ग्रामीण भाग असल्याने मुलींचे पालक कामाला जातात आणि त्यामुळे अशावेळी या मुलींची  काळजी घ्यायला कोणीही नसते. मग मुली घरीच थांबतात आणि त्यानंतरचे दिवसही गैरहजर राहतात. अशा परिस्थितीत मुलींसाठी शाळेतच काही उपाययोजना करणे फार गरजेचे आहे. त्यातील प्रमुख उपाय म्हणजे शाळेत सॅनिटरी पॅड ची सोय असणे. म्हणून मी ठरवले कि शाळेत सॅनिटरी पॅड चा एक बॉक्स आणून ठेवायचा , म्हणजे मुलींना जेव्हा गरज लागेल तेव्हा ते त्याचा वापर करतील. 
 माझे मित्र सचिन जी म्हसे अनेक दिवसांपासून शाळांना सॅनिटरी पॅड चे वाटप करतात . त्यामुळे मी त्यांना संपर्क साधला. त्यांनी लगेच १०० सॅनिटरी पॅड आणून दिले. त्यातील. काही मुलींना वाटले आणि बाकी भिंतीला एक बॉक्स लावून त्यात ठेवले.  आता मुली जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा त्या सॅनिटरी पॅड घेतात. 

 मुलींचे आरोग्य उत्तम राहणे फार गरजेचे आहे. यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल ,  या बॉक्स मुळे  मुलींमध्ये थोडा आत्मविश्वास येईल अशी मला आशा आहे. 


No comments:

Post a Comment