Saturday 11 February 2023

शनिवार - दप्तराविना शाळा

Seed Balls
वनसंपदा संपवण्यासाठी हजारो टोळ्या कार्यरत आहेत, तशाच वनसंपदा जगवण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी तितक्याच किंबहुना त्यापेक्षाही अधिक हात कार्यरत आहेत. मात्र, ज्या ठिकाणी रोपं लावायची किंवा बीजारोपण करायचं ती ठिकाणं रहिवाशी क्षेत्रापासून लांब असतात. करिअर, नोकरी, कुटुंब सोडून नियमित त्या ठिकाणी जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश वृक्षारोपणाच्या चळवळी या नागरी वसाहतींच्या चौफेर मर्यादित राहिलेल्या दिसतात. समजा कुणी दूर अंतरावर जाऊन एखाद्या माळरानावर किंवा डोंगरावर बीजारोपण केलं किंवा रोपटी लावली तरीही त्यातल्या बहुतांश रोपांच्या नशिबी पुढचा पावसाळा नसतो. उन्हाळ्यात स्थानिकांना पिण्यासाठीही पाणी राहत नाही, अशा वातावरणात रोपांच्या वाट्याला घोटभर पाणी यावं, अशी अपेक्षा मृगजळासारखी ठरावी.
अशा प्रतिकूल परिस्थितीत वनीकरणाचा विचार रुजवायचा असेल तर त्यासाठीची पद्धतीही बदलावी लागणार आहे. त्याच अनुषंगाने गेल्या पाच वर्षांत बियांची रुजूवात करण्यासाठी ’सीड बॉल्स’ ही अत्यंत सोपी, स्वस्त आणि उपयुक्त संकल्पना वापरली जाते आहे.यात माती, शेणखताचा वापर करत गोळे बनवले जातात. त्यात जांभूळ, बोर, शिवण, आवळा, बकूळ, पांगारा, अमलताश, विलायती चिंच, फणस, आंबा अशा विविध झाडांच्या बिया खोवल्या जातात. हे सीड बॉल्स पावसाळ्यात त्यातल्या बिया आणि पर्यावरणासाठी अत्यंत पोषक ठरतात. बाहेर कडाक्याचं ऊन आणि तोंडावर आलेला पावसाळा असा हा काळ सीडबॉल्स बनवण्यासाठी सर्वोत्तम आहे. एकदा पावसाळा सुरू झाला की, तयार केलेले सीडबॉल्स घेऊन मोहीमेवर निघता येतं. हे गोळे निश्चित केलेल्या ठिकाणी दूरवरुन फेकून दिले तरीही चालतात. शेणमातीच्या मिश्रणामुळे ते फुटत नाहीत.
काही दिवसांआधी शाळेत Ignited Minds तर्फे आयोजित चर्चासत्रात Paper Seed Balls विषयी माहिती मिळाली. आज शनिवारी , दप्तराविना शाळेच्या दिवशी मुलांनी हसत-खेळत शंभरावर सीड बॉल्स तयार केलेत. आवरण या बियांना ऊब आणि ओलावा असं पोषक वातावरण मिळवून देत असतं. रुजताना फार कष्ट लागत नसल्याने, आलेली रोपं अधिक चांगली आणि वेगाने मोठी होतात.https://youtube.com/shorts/x_ANy6V-KqY?feature=share

No comments:

Post a Comment