Thursday, 16 February 2023


परवा एका मित्राशी फोन झाला. तोही शिक्षकच आहे. त्याच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीविषयी तो सांगत होता. त्या विद्यार्थिनीच्या घरी काहीतरी झाले आणि त्या ताणामुळे ती खूप दिवसांपासून वर्गात शांत च होती. बोलणे-हसणे बंदच होते. नंतर खरे कारण समजले. सर्वांनी तिची समजूत काढली तेव्हा कुठे ती नॉर्मल वागायला लागली. पण या ताणाच्या काळात जर तिने नको ते पाऊल उचलले असते तर ?.. हा विचार माझ्या मनात पर्वापासून रेंगाळत आहे. मुलांना बाहेरची काही समस्या असल्यास ते घरी आई-वडिलांना सांगतात पण घरी काही झाले तर ते कुणाला सांगतील. त्या मुलीला तिच्या सरांशी का बरं बोलावसं वाटले नाही ? मुले दिवसभर शाळेत असतात, लहान मोठ्या अनेक गोष्टी शिक्षकांना सांगतात. पण अशा गोष्टी बोलायला मुलांची का बरं हिम्मत होत नाही ?
शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांशी असे नाते बनवायला कुठे कमी पडतोय काय ?

मी विद्यार्थ्यांशी वागतांना , बोलतांना त्यांच्याशी मित्रत्वाच्या भावनेनेच बोलतो. पण वरील प्रसंगाने मला जरा भीतीच वाटली. माझ्या विद्यार्थ्यांना अशा काही समस्या तर असणार नाही ना ? ते मला सांगायला संकोच तर करीत नसतील ना ? किंवा त्यांना मला जेव्हा सांगायचे असेल तेव्हा मी त्यांच्यासाठी उपलबध नाही असे तर नसेल ना ?

खरं म्हणजे अशा वेळी मी शिक्षक म्हणून त्यांच्यासाठी उपलब्ध असायलाच पाहिजे. Child Helpline या विषयी मी मुलांना नेहमीच सांगत असतो. पण कधी कधी वाटते असे करून मी आपली जबाबदारी झटकून टाकतोय कि काय ? 
मुले माझ्यापर्यंत कधीही पोहचावी या हेतूने मी मुलांसाठी '𝙃𝙚𝙡𝙥 𝙈𝙚 𝙎𝙞𝙧' सुरु केलंय . काहीही समस्या असो, कधीही असो मी नेहमी त्यांच्या मदतीसाठी आहे हाच हेतू. 


No comments:

Post a Comment